रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजीटल सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन देण्याच्या सुविधेचा ५२ लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

डिजीटल सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन देण्याच्या सुविधेचा ५२ लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ 

सौजन्य : सकाळ
दिनांक : 10-Jul-20
पुणे - राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ५२ लाखाहून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला आहे.
महसूल विभागातील भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि खाते उतारा ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा देखील आहे. जून महिन्यात नागरिकांनी उतारा डाउनलोड केल्यामुळे त्यातून राज्य सरकारला २ कोटी ६० लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. खरीप पीक कर्ज, पीक विमा आणि विविध योजनांसाठी डिझिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा कायदेशीर धरला जातो.
                एका क्‍लिकवर २ कोटी ५२ लाख उतारे : राज्यात एकूण २ कोटी ५२ लाख संगणकीकृत सातबारा उतारे आहेत. त्यापैकी २ कोटी ४९ लाख सातबारा उतारे हे डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे आहेत. त्यामुळे राज्यातील ९९ टक्के सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरी असल्यामुळे नागरीकांना घरबसल्या महाभूमी पोर्टलवर एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहेत.
                 ई-फेरफारचाही नवा उच्चांक : ई-फेरफार प्रकल्पातंर्गत फेरफार उताऱ्यावर देखील ऑनलाइन नोंदी घेण्याचे काम केले जाते. दर महिन्याला या सुविधेच्या माध्यमातून सुमोर पावणे दोन ते दोन लाख फेरफार उताऱ्यावर नोंदी घातल्या जातात. मात्र जून महिन्यात ऑनलाइनच्या माध्यमातून तब्बल ३ लाख १३ हजार फेरफार उताऱ्यांवर नोंदी घालण्यात आल्यामुळे हा देखील नवा उच्चांक आहे.
💬डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारे, फेरफार आणि खाते उतारा नागारिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा विभागाकडून दिली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांना होत आहे. जून महिन्यात ५२ लाखाहून अधिक जणांनी त्याचा वापर केला आहे. - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, ई. फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक

Comments

Archive

Contact Form

Send