रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

गाव नमुना नं. ७/१२ बाबत अधिकची स्पष्टीकरणात्मक माहिती



              
  गाव नमुना नं. ७/१२ बाबत अधिकची स्पष्टीकरणात्मक माहिती

१.       भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक – म्हणजेच सर्वे नं., गट नं. किंवा खासरा नंबर व त्याचा पोट हिस्सा

२.       भूधारणा पद्धत – म्हणजेच जमीन कोणत्या अटीशर्तीवर धारण केली आहे त्याचा संशिप्त तपशील

३.       भोगवटादार वर्ग १ – म्हणजेच बिनदुमाला जमीन कायमची व हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील कोणत्याही निर्बंधावाचून संपूर्ण भोगवटयाच्या अधिकारान्वये किंवा भूमिस्वामी हक्काने धारण करीत असेल अशी जमिन.

४.       भोगवटादार वर्ग २ – म्हणजेच बिनदुमाला जमीन कायमची व हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधाना अधीन राहून भोगवटयाच्या भूमिस्वामी हक्काने किंवा भूमिधारी हक्काने जमीन धारण करीत असेल अशी जमिन. 
 
५.       सरकार – म्हणजेच ही जमीन शासनाच्या मालकीहक्काची आहे.

६.       सरकारी पट्टेदार- म्हणजेच कलम ३८ प्रमाणे  शासनाकडून काही अटीशर्तीवर भाडेपट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती.

७.       शेताची स्थानिक नाव- शेती क्षेत्राची ओळख दर्शविणारे स्थानिक नाव.

८.       क्षेत्राचे  एकक – म्हणजेच यात नमूद केलेल्या जमीन क्षेत्राचे एकक काय आहे. सर्व शेतजमिनी हे.आर.चौ.मी आणि अकृषिक जमिनीचे क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये नमूद केले जाते.

९.       लागवडीयोग्य क्षेत्र – म्हणजेच मूळ जमाबंदीचे वेळी हे क्षेत्र पिकांची लागण करण्यायोग्य होते व त्यावर  जमीन महसूल (आकार) निश्चित केला आहे.

१०.   पोट खराब – म्हणजेच मूळ जमाबंदीचे वेळी हे क्षेत्र पिकांची लागण करण्यायोग्य नव्हते व त्यावर जमीन महसूल (आकार) लावलेला नाही.

११.   पोट खराब – वर्ग अ  - म्हणजेच लागवडीसाठी संपूर्णतया अयोग्य असलेल्या ज्या जमिनीचे सपाटीकरण, भरावकरून अथवा जलसिंचनाच्या सोयीकरून लागवडीयोग्य जमीन म्हणून रुपांतरीत करू शकतो ती जमीन होय. उदा. डोंगराळ, खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक व पाणी इ. असलेले क्षेत्र

१२.   पोट खराब – वर्ग ब  - म्हणजेच विशिष्ट प्रयोजनासाठी राखून ठेवलेल्या व म्हणून लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या जमीन क्षेत्र म्हणजेच पोट खराब वर्ग ब चे क्षेत्र होय. उदा. सार्वजनिक रस्ते, जलप्रवाह/ कालवे, तलाव, स्मशानभूमी, कोंडवाडा, बारव, इ. असलेले क्षेत्र.

१३.   आकार – म्हणजेच शेत जमिनीचा शासनास देय असलेला जमिन महसूल

१४.   अकृषक आकार – म्हणजेच अकृषक प्रयोजनासाठी केलेल्या जमिनीच्या उपयोगासाठी शासनास  देय असलेला महसूल किंवा निश्चीत  केलेली आकारणी

१५.   खाते नंबर – जमीन महसूल व उपकार म्हणून शासनास देय रक्कम प्रदानासाठी प्रथम जबाबदार असणाऱ्या व्यक्तीने, व्यक्तीसमुहाने, किंवा संस्थेने त्या गावात धारणकेलेल्या जमीन क्षेत्राची एकत्रित माहिती दर्शविणाऱ्या गाव नमुना नं ८ अ (खात्याचा) नंबर.

१६.   जुडी किंवा विशेष आकारणी - म्हणजेच दुमालदारांकडील शिल्लक वगळता वसूल पात्र जमीन महसूल

१७.   भोगवटादाराचे नाव - म्हणजेच जमिनीचे वैध कब्जेदाराचे नाव.

१८.   फेरफार क्रमांक – म्हणजेच जमिनीचे हक्काचे हस्तांतर, कर्ज बोजे, ईकरार आणि जप्ती आदेशाने होणारे बदल दर्शविणारे गाव नमुना नं.६ मधील फेरफार पत्रकाचा क्रमांक.

१९.   प्रलंबित फेरफार – म्हणजेच हक्काचे हस्तांतर, कर्ज बोजे, ई-करार आणि जप्ती आदेशाने होणारे बदल करण्यासाठी गाव नमुना नं. ६ मध्ये नोंदविण्यात आलेले तथापि अद्याप निर्णय न झालेले फेरफार.

२०.   शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक – म्हणजेच या ७/१२ नोंदविलेला शेवटचा फेरफार क्रमांक व तो फेरफार नोंदविल्याचा दिनांक. ई-फेरफार प्रणालीद्वारे फेरफार प्रक्रिया ऑनलाईन झाल्या नंतर (सन २०१५-१६) ज्या ७/१२ वर कोणताही फेरफार नोंदविला नसल्यास त्या ७/१२ वर शेवटचा फेरफार क्र. व दिनांक छापला जाणार नाही.

२१.   जुने फेरफार क्रमांक – म्हणजेच या ७/१२ वर यापूर्वी झालेले बदल दर्शविणाऱ्या तपशीलवार नोंदीचा गाव नमुना नं ६ मधील फेरफार पत्रकाचे क्रमांक होय.

२२.   सीमा व भूमापन चिन्हे – म्हणजेच या जमिनीच्या भागाची सीमा नियोजित करण्याकरीता भूमापन अधिकाऱ्याने किंवा महसूल अधिकाऱ्याने उभारलेली कोणतीही निशाणी जसे मातीचा अथवा दगडाचा बांध, कुंपण, बिन-नांगरलेला बांध, किंवा जमिनीची पट्टी अथवा मोजणीचा दगड होय.

२३.   हंगाम – म्हणजेच ज्या कालावधीत पीक घेतले आहे तो वर्षातील विशिष्ट कालावधी जसे खरीप (जुन ते सप्टेंबर), रब्बी (ऑक्टोंबर ते जानेवारी), उन्हाळी (फेब्रुवारी ते मे) व पीक वार्षिक अथवा बहुवार्षिक असल्यास संपूर्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात येते तो कालावधी होय.

२४.   मिश्र पीक व घटक पीक – म्हणजे एकाच क्षेत्रावर एकाच वेळी एका पेक्षा जास्त पिके घेतली असल्यास त्याला मिश्र पीक म्हणतात व त्यातील प्रत्येक पिकाला घटक पीक म्हणतात.

२५.   निर्भेळ पीक - म्हणजे एका क्षेत्रावर एकावेळी एकच पीक घेतली असल्यास त्याला निर्भेळ पीक म्हणतात

२६.   जलसिंचीत व अजलसिंचित – जी पिके पाऊसाच्या पाण्यावर घेतली जातात त्यांना जिरायत पिके किंवा अजलसिंचीत पीक म्हणतात तर बाह्य पाण्याचा पुरवठा करून घेतलेल्या पिकांना बागायत पिके किंवा जलसिंचीत पिके म्हणतात.

२७.   लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन – म्हणजेच कोणत्याही विशिष्ट हंगामात पिकाखाली नसलेली जमीन.

२८.   जलसिंचानाचे साधन – कोणत्याही पिकाला ज्या जलश्रोतातून पाणीपुरवठा  केला जातो ते साधन

रामदास जगताप 
राज्य समन्वयक 
ई फेरफार प्रकल्प ,
दिनांक १.६.2020

Comments

Archive

Contact Form

Send