जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.
जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.
------------------
शेतकरी खातेदार बंधू भगिनी यांनी कृपया याकडे लक्ष द्यावे (
1) जमीन खरेदी विक्री व्यवहार सब रजिस्ट्रार ऑफिसला नोंदणीकृत असावा .
2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका. (प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळे आहे )
3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्या पेक्ष्या कमी असेल तरी खरेदी करता येते. त्यासाठी मंजूर रेखांकन व त्या प्रमाणे पोटहिस्सा मोजणी झालेली असावी
4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी करता येत नाही.
5) आदिवासी व्यक्तीची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करता येत नाही.
6) वर्ग 2 म्हणजे इनाम वतन देवस्थान इत्यादी जमीन सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर विकता येत नाही.
7) नोटरी किंवा 100 च्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन वर्ग 2 ची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवणे याला कोणताही कायदेशीर आधार नाही.
8) जमिनीवर कोणत्याही संस्थेचा बोजा कमी न करता जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार कायदेशीर नाही.
9) सहहिस्सेदार यांची सहमती न घेता परस्पर जमीन विक्री करणे कायद्याने गुंतागुंत वाढविणारे आहे त्यासाठी अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र करता येते परंतु त्यात दिशा व हिस्सा ठरलेला नसतो
10) देवस्थान व महार वतन जमीन परस्पर विक्री करता येत नाही याला महाराष्ट्र शासनाची / जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.
11) कायद्याने बहीण व बहिणीच्या पश्चात तिची मुले यांची नावे 7/12 पत्रकाच्या कब्जेदार सदरी लावावी लागतात.
12) हक्क निर्माण झालेल्या व्यक्ती कडूनच नोंदणीकृत हक्कसोडपत्र करता येते.7/12 पत्रकावर नावाची नोंद करण्यापूर्वी हक्कसोड पत्रक करू नये.
13) एक लाख 60 हजार रुपया पेक्ष्या जास्त रक्कमेचा वितसंस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी गहाण खत करणे आवश्यक आहे.एक लाख रूपया वरील बोजा कमी करण्यासाठी नोंदणीकृत ऋणमोचक दस्त करणे आवश्यक आहे.
14) एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करताना सदर नोंद झालेली डायरी च्या आधारे त्या परिवारातील सर्व कायदेशीर वारसांची नावे कब्जेदार सदरी येणे कायद्याने आवश्यक आहे.दिशाभूल करणारा एकत्र कुटुंब प्रमुख चुकीच्या कृती बद्दल कायदेशीर कारवाईस पात्र आहे.
15) अज्ञान व्यक्तीच्या पालकास अज्ञान व्यक्तीची शेत जमीन किंवा मिळकत विकण्याचा कोणताही अधिकार नसतो तेव्हा अशा व्यक्ती कडून कोणतीही मिळकत विकत घेऊ नये. या साठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते.
16) मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे लावणे आवश्यक आहे. तथापि एकादे नाव जाणीवपूर्वक न लावल्यास ती व्यक्ती आपले नाव आवश्यक पुरावे सादर करून लावून घेऊ शकते त्याचा कायदेशीर हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही पण सदरची कृती वेळेत करणे हिताचे असते.
17) शेतजमीन अथवा मिळकत यांचा कायदेशीर व्यवहार करण्यासाठी 7/12 पत्रकावरील मयत व्यक्तीचे नाव कमी करावे लागते.
18) एकाद्या वारसाचे नाव वगळून कायदेशीर वाटणीपत्र करता येत नाही.
19) शेत जमिनीचे तुकड्यात म्हणजे 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात वाटणीपत्र करता येत नाही.
20) वारसा हक्काने प्राप्त जमीन बक्षीस देता येत नाही.स्वकष्टार्जित मिळकत बक्षीस देता येते.
21) सामाईक मालकीची जमीन सर्वांच्या मालकीची असते एकाध्या हिस्सेदाराने अन्य सहहिस्सेदार यांचे संमती शिवाय विकल्यास व्यवहार अविभाज्य हिस्स्याचा होतो .
22) शेतजमीन तुकड्यात बक्षीस देता येत नाही.
23) कमी जास्त पत्रका आधारे शेतजमीन व प्लॉटचे पोट हिस्से पाडता येतात.
24) अंतिम रेखांकना मध्ये ओपन स्पेस,विशिष्ट सोय निर्माण करण्यासाठी आरक्षित ठेवलेली जागा विकासकाला विक्री करता येत नाही.
25) मिळकतधारक बेपत्ता झाला असेल तर 7 वर्षा नंतर मा दिवाणी न्यायालयात अर्ज करून त्याचे वारस सदर व्यक्ती मृत घोषित करून घेऊ शकतात व आपली नावे मिळकतीस लावू शकतात.
28) एकाद्या व्यक्तीला सरळ वारस म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी नसेल तसेच त्याने मृत्यूपत्र केले नसेल तर त्याचे नजीकचे वारस दिवाणी न्यायालयात अर्ज करून वारसा सिद्ध करून वारसा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन आपली नावे वारसाने लावू शकतात.
29) 7/12 किंवा मिळकतीचा पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी त्या 7/12 अथवा मिळकती मधील सर्व फेरफार किंवा डायरी काढून तपासणी करावी यालाच सर्च रिपोर्ट म्हणतात.हे अभिलेख अभिलेख कक्षात मिळू शकतात.
30) सन १९७१ च्या नियमाप्रमाणे शेती कसणाऱ्या व्यक्तीचे नाव हा जुन्या गाव नमुना न. ७, ७अ व १२ वरून म्हणजेच आजच्या ७/१२ वरून वगळण्यात आला आहे अशा वेळी कायदेशीर रित्या जमीन कसणाऱ्या व्यक्तीने प्रतीवर्षी तहसील कार्यालयास अर्ज करून जमीन कसत असल्याच्या हक्काचे कागदपत्रासह अर्ज करावा व तहसीलदार यांनी त्यांची वहिवाट कायदेशीर आहे असे मान्य केल्यास त्याचे नावाची नोंद गाव नमून न.७ ब मध्ये घेण्याची तरतूद आहे.
31) शेत जमीन,रहिवाशी बिगरशेती,वाणिज्यविषयक बिगरशेती,औद्योगिक बिगरशेती हे जमिनीचे वापरनिहाय प्रकार आहेत.
32) ब्ल्यू झोन,ग्रीन झोन,रेड झोन,यलो झोन हे जमिनीचे भौगोलिक प्रकार म्हणता येईल,ब्ल्यू झोन पाणी नदी क्षेत्र,रेड झोन पुराचे पाणी येणारे क्षेत्र,ग्रीन झोन शेती क्षेत्र,यलो झोन रहिवासी क्षेत्र.
33) लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत सातबारा पत्रकावर पती बरोबर पत्नीचे नाव लावून सातबारा पतिपत्नी यांच्या सयूंक्त मालकीचे करता येते.
34) मृत्यूपत्र नोंदणीकृत व विना नोंदणीकृत दोन्हीची कायदेशीर वैधता समान असते.
35) सहकार कायद्या अंतर्गत वसुलीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या वसुली अधिकारी यांच्या बोजा नोंद करण्याच्या प्रक्रियेत हरकत घेण्यास कायदेशीर आधार शिल्लक राहत नाही.
37) शासनाने वाटप केलेली जमीन ज्या उद्देशाने दिली आहे त्या शिवाय विना परवानगी त्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी सदर जमीन वापरली जाऊ लागली तर शासन सदर जमीन परत घेऊ शकते.
38) वारसाने जुन्या काळात बहिणीची नावे इतर हक्कात नमूद असतील तर अर्ज इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेता येतात.
39) 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर अज्ञान व्यक्ती सज्ञान होते व ती सातबारावरील आपले अपाक शेरा कमी करून स्वतःचे नाव लावू शकते.
40) सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत वर्ग दोनची जमीनीचे गट ऑन line ब्लॉक केले आहेत तेव्हा सदर वर्ग 2 वरील कोणतेही व्यवहार नोंद करण्यासाठी सदरचा गट खुला करण्यासाठी तहसील कार्यालयास अर्ज करावा लागतो व गट खुला झाल्या नंतरच तलाठी यांना नोंद करता येते.
४१) गाव नमुना ७/१२ , ८अ आणि ६ सध्या डिजिटल स्वाक्षरीने महाभूमी पोर्टल वर वितरणासाठी उपलब्ध आहेत त्याला कायदेशीर वैधता बहाल केली असल्याने त्यावर कोणाचीही सही असण्याची आवश्यकता नाही मात्र अशा प्रत्येक सातबारा वरील तपशील त्यावरच असलेला १६ अंकी पडताळणी क्रमांक वापरून त्याची वैधता तपासता / पडताळणी करता येते.
४२) भूलेख वरील विनाशुल्क सातबारा व खाते उतारे फक्त महिती साठी आहेत त्यामुळे त्यांचा वापर कोणत्याही कायदेशीर कामासाठी करू नये
आपला
रामदास जगताप
दि 20.८.२०२१
खुपच उपयुक्त माहिती दिली आहे. 👍 Great
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete