गाव नमुना नं.६अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) व गाव नमुना नं.६क (वारस नोंदवही) संगणकीकृत करणे बाबत
क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स. / मा.सु. /199 / 2021
दिनांक : 20.5.2021
विषय- गाव नमुना नं.६अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) व गाव नमुना नं.६क (वारस नोंदवही) संगणकीकृत करणे बाबत
महोदय,
ई-महाभूमी प्रकल्प
अंतर्गत कार्यान्वित असलेल्या ई-फेरफार प्रणालीत गाव नमुना नं. ६ आणि गाव नमुना नं.७/१२
संपूर्ण संगणकीकृत झाल्या नंतर आता गाव नमुना नं.६अ (विवादग्रस्त प्रकरणांची
नोंदवही) व गाव नमुना नं.६क (वारस नोंदवही) संगणकीकृत करणेचा निर्णय घेण्यात आला
असून अशी सुविधा ई-फेरफार प्रणाली मध्ये विकसित करण्यात आली आहे.
अ) गाव नमुना नं.६अ
(विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) –
नोटीस देणे आवश्यक
असणाऱ्या कोणत्याही फेरफार वर १५ दिवसांच्या आत हरकत आल्यास अशी हरकत तलाठी यांनी
ई-फेरफार प्रणालीत नोंदविणे आवश्यक आहे त्यानंतर सदरचा फेरफार चा निर्णय
विवाद्ग्रस्त प्रकरण म्हणून सक्षम अधिकारी यांनी केल्या नंतरच सदरचा फेरफार
प्रमाणित करता येईल. गाव नमुना नं.६अ संगणकीकृत करताना खालील महत्वाच्या सूचना
लक्षात घ्याव्यात.
१. गा.न.नं. ६अ हा कायमचा
नमुना असल्याने तो संगणकीकृत करताना हस्तलिखित तक्रार / हरकत नोंदवहीतील शेवटचा क्रमांक
भरणे आवश्यक आहे. शेवटचा तक्रार नोंद क्रमांक
भरल्या नंतर पुढील सर्व विवादग्रस्त अर्ज ई फेरफार प्रणालीत ऑनलाईन नोंदविण्यात
यावेत व हस्तलिखित गाव नमुना नं ६अ कायम स्वरूपी बंद करण्यात यावा. मात्र त्या पूर्वी हस्तलिखित तक्रार/ विवादग्रस्त
नोंदवही चा क्रमांक गाव निहाय अचूक भरावा.
२. विवाद ग्रस्त नोंदीची
माहिती भरताना तक्रार अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार
क्र. मोबाईल नं. इत्यादी माहिती अचूक भरावी आणि हरकत अर्जाचा थोडक्यात तपशील नमूद
करावा आणि हरकत अर्जाची प्रत स्कॅन करून अपलोड करावी.
३. गाव नमुना ६अ ची कच्ची
प्रत, हरकत अर्जाचा तपशील आणि हरकत अर्जाची स्कॅन करून अपलोड
केलेली प्रत तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
४. हरकत अर्जावर यथोचित
सुनावणी घेवून सक्षम अधिकाऱ्याने निर्णय दिल्यानंतर सक्षम अधिकाऱ्याचा निर्णय
थोडक्यात नमूद करून आदेशाची प्रत अपलोड केल्यानंतर सदरचा फेरफार मंडळ अधिकारी
यांना निर्गत करण्यासाठी उपलब्ध होइल आणि फेरफार निर्गातीचा शेरा गाव नमुना ६ आणि
६अ वर नमूद केला जाईल.
५. एका फेरफारवर एकाच ६अ
भरता येईल काही प्रकरणात एका पेक्षा जास्त हरकतदार यांचे कडून एका पेक्षा जास्त
हरकत अर्ज आले तरी तलाठी यांनी सर्व हरकत अर्जाचा तपशील एकत्र तयार करून आणि हरकत
अर्जाची स्कॅन प्रत अपलोड करून एकच गा.न.नं.६अ तयार करावा.
६. विवादग्रस्त
प्रकाणासाठी फिफो (FIFO) लागणार नाही तसेच असे फेरफार मंडळ अधिकारी यांच्या
पुर्वावलोन अमान्य (री एन्ट्री) साठी पात्र राहतील.
आ) गाव नमुना नं.६क (वारस
नोंदवही) –
कोणत्याही गावातील
खातेदार मयत झाल्यास त्याचे वारस निश्चित करण्यासाठी किंवा अभिलेखावर दाखल
करण्यासाठी गाव नमुना नं. ६क मधील नमुन्यात वारस ठराव केला जातो त्यालाच वारस नोंद
म्हटले जाते. मयत खातेदारचे वारसांपैकी एकजन किंवा अन्य व्यक्ती वारसांची संपूर्ण
माहिती देवून वारसांची नावे अधिकार अभिलेखावर दाखल करण्याची विनंती करतो त्यावेळी
त्याची नोंद गाव नमुना नं. ६क मध्ये घेतली जाते त्यानंतर स्थानिक चौकशी करून
वारसांचे अचूकते / परीपुर्तते बाबत खात्री करून मंडळ अधिकारी यांना स्थानिक चौकशी
अहवाल व आपला अभिप्राय कळवितात आणि मंडळ अधिकारी यांना आणखी योग्य व आवश्यक वाटेल
अशी चौकशी / पडताळणी करून असा वारस ठराव दुरुस्त करून किंवा आहे तसा मंजूर करतील
किंवा करणे देवून नाकारतील. त्यानंतर आशा मंजूर वारस ठरावाप्रमाणे फेरफार आपोआप
नोंदविला जाईल आणि त्याची नमुना ९ ची नोटीस काढून सर्व हितसंबंधित यांना बजावण्यात
येईल त्यावर १५ दिवसांच्या नोटीस कालावधीत हरकत न आल्यास फेरफार मंडळ अधिकारी
यांचे कडून निर्गत केला जातो आता हि संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करणेत आली असून
त्या बाबत महत्वाचे मुद्दे तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी लक्षात
घेणे आवश्यक आहे .
१. गाव
नमुना नं. ६क (वारस नोंदवही) ही कायमची नोंदवही असल्याने हस्तलिखित गाव नमुना न.
६क चा शेवटचा क्रमांक प्रथम ई फेरफार प्रणालीत भरावा लागेल आणि त्यानंतर होणारे
सर्व ६क नोंदी ऑनलाईन करून हस्तलिखित गाव नमुना ६क कायम स्वरूपी बंद
करावा. तथापि त्यापूर्वी गाव निहाय हस्तलिखित गा. न. नं. ६क चा शेवटचा क्रमांक
अचूक भरावा.
२. कोणत्याही
मयत खातेदाराचे वारसांची वारस नोंद करण्यासाठी अर्ज आल्यास त्याची प्रथम नोंद गाव
नमुना न. ६क मध्ये करण्यात येथे तेथेच वारस तपास करून किंवा स्थानिक चौकशीच्या
आधारे वारस निश्चित केले जातात त्यामुळे तलाठी कार्यालयात आलेल्या या बाबत च्या
राजाची नोंद ग.न.नं ६क मध्ये प्रथम करावी तसेच ई हक्क प्रणालीतून प्राप्त अर्जाची
नोंद देखील थेट वारस नोंदवहीत होईल आणि त्याठिकाणी तलाठी यांनी स्थानिक तपास करून
स्थानिक चौकशी अहवाल अपलोड करून आपला अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे.
३. मंडळ
अधिकारी यांनी त्यांना आवश्यक वाटेल अशी अधिकाची चौकशी करून सदरचा वारस ठराव मंजूर
केल्या नंतर त्याचा फेरफार (गाव नमुना नं. ६) आपोआप तयार होईल.
४. फेरफार
नोंदवहीवर नमुना ९ ची नोटीस काढून पुढील प्रक्रिया करावी.
५. या
नंतर हस्तलिखित वारस नोंदवही भरण्याची गरज असणार नाही
६. वारस
ठरावासाठी नोटीस कालावधी नसला तरी तलाठी यांनी वारासांबाबत स्थानिक चौकशी करून त्याबाबतचा
अहवाल अपलोड करून वारस ठरावा बाबतचा आपला अभिप्राय ऑनलाईन नोंदविल्या शिवाय वारस
नोंदवही मंडळ अधिकारी यांना प्रमाणित करता येणार नाही.
थोडक्यात
आता ई-फेरफार प्रणाली मध्ये गाव नमुना नं. ६, ६अ,
६क, ७/१२ आणि ८अ संगणकीकृत करण्यात आले आहेत
ह्याची सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात हि विनंती
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
ई- फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कर्यालय, पुणे
प्रत मा. उप आयुक्त (महसूल) , विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व) यांना माहिती साठी
Comments