रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मधील प्रस्तावित बदला बाबत अभिप्राय कळविणे बाबत


विषय :- सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मधील प्रस्तावित  बदलाबाबत अभिप्राय कळविणे बाबत 


                                राज्यात महसूल विभागाकडील शासन निर्णय क्रमांक रा. भू. . २०१३/प्र.क्र.३२/-               दिनांक २३.०१.२०१३ अन्वये - फेरफार हा ऑनलाईन म्युटेशनचा कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र , पुणे यांचे मार्फत -फेरफारही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. सदर आज्ञावलीव्दारे राज्यभरात ऑनलाईन  फेरफार घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक : सीएलआर-१००३/प्र.क्र.४७/ल-१  सेल दि. ०३ डिसेंबर २००५ अन्वये या संगणकीकृत अधिकार अभिलेखांना कायदेशीर वैधता देण्यात आली आहे. राज्य शासनाने महसूल वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक : रा.भू...का.२०१६ प्र.क्र. १८० / -१  दिनांक ११ जुलै,२०१७  अन्वये  हस्तलिखित ७/१२ चे वितरण दिनांक ३१ जुलै ,२०१७ पासून पूर्णतः बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेणेत आला आहे.

               शासन निर्णयान्वये  शासनाने गाव नमुना नं ७/१२ व ८(अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी  महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क टाकण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे विहित गाव नमुना नं.७/१२ मध्ये यथोचित बदल करणेत आला आहे त्याचवेळी सध्याचा गाव नमुना नं.७/१२ मध्ये कालानुरूप काही बदल करून तो सामान्य माणसाला समजण्यासाठी अधिकसोपा होण्यासाठी संगणकीकृत ७/१२  मध्ये खालीलप्रमाणे बदल  प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१.       गाव नमुना नं. ७ मध्ये गावाचे नावासोबत LGD (Local Governmnt Directory) कोड दर्शविण्यात येईल.
२.       गाव नमुना नं.७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात येईल.
३.       नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे. यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी. हे एकक वापरले जाईल.
४.       नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत कंसात नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.
५.       नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या, आत्ता  ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून खोडून (strike through) दर्शविण्यात येतील.
६.       कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
७.       कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकाण्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन समाविष्ट रकान्यात दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
८.       या नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.
९.       शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील.
१०.    नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेद लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
११.    नमुना १२ मध्ये ज्या रकान्यात कोणतीही माहिती नाही असे मिश्रणाचा संकेतांक, अजलसिंचीत व जलसिंचीत हे तीन रकाने छापण्यात येणार नाहीत.
१२.    बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने  या क्षेत्रासाठी गाव नमुना नं १२ ची  आवश्यकता नाही  अशी सूचना छापण्यात येईल.
प्रस्तावित बदल ७/१२ मध्ये कसे दिसतील हे सोबतच्या ७/१२ पाहता येतील . ते पाहून आपण आपले अभिप्राय अथवा सूचना पाठवाव्यात 

               वरील प्रमाणे सर्व सुधारणा सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मध्ये प्रस्तावित करणेत आल्या असून त्याचे सादरीकरण मा.मंत्री महसूल व मा. अप्पर मुख्य सचिव महसूल यांना केले असता त्यावर महसूल विभागातील क्षेत्रीय स्थरावर काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिप्राय घेण्याचे निर्देश मा. महसूल मंत्री महोदयांनी दिले आहेत म्हणून यावर आपले अभिप्राय अपेक्षित केले आहेत.

          कृपया आपण आपले माझे ई मेल आय डी वर (ramdasjagtapdc@gmail.com) पाठवावेत ही विनंती.

आपला विश्वासू


रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
दैनांक ५.७.२०२०   

Comments

  1. गाव नमुना नंबर १२ मध्ये पिक पाणी साठी प्रत्येक खातेदार साठी वेगळे provision असावे, कारण, पिक कर्ज नाववरती असलेल्या पिकांवरती मिळते,सामाईक पिक पाणी मध्ये कुणाचे पिक कोणते याचा बोध होत नाही, यामध्ये पिक विमा, ठिबक सिंचन, बियाणे, कारखाना ऊस नोंदणी करण्यासाठी अडचण येते.तसेच सिंचन साधन मध्ये एका गट नं मधे जर तीन विहिरी असतील व खातेदार चार असतील तर त्या विहिरी नेमक्या कुणाच्या यांचा फोन होत नाही व खरेदी विक्रीस अडचण येते, कोणत्याही बँकेचे अथवा सोसायटी/पतसंस्थेचे कर्ज परतफेड केल्यानंतर ७/१२ नाव delete होवून फक्त फेरफार नंबर असावा त्यामुळे ७/१२ lengthi होणार नाही it is my own recommendation to incorporate these provisions in new 7/12. Remaining changes rest with you.

    ReplyDelete
  2. In my comments , please read as बोध होत नाही in place of फोन होत नाही,

    ReplyDelete
  3. नमस्कार सर,पोटखराब लागवड अयोग्य यामध्ये वर्ग क रस्ता खालील क्षेत्र दर्शविण्यात यावे. ग्रामीण भागात रस्ता खालील क्षेत्र न दर्शविल्यामुळे पाणंद रस्ते वर अतिक्रमण करून वहिवाट केली जाते. तसेच म.ज.म.अधिनियम1966 कलम 143 खाली रस्ता मंजूर झालेस भूमी अभिलेख विभाग अहवाल नुसार तेवढे क्षेत्र नमुना सात मध्ये नोंद घेता येईल.धन्यवाद सर,नारायण मोरे, नायब तहसिलदार सातारा

    ReplyDelete
  4. Gav namuna 12 Pik pahni sadari khatedarachi kiva khate kramank nmud karaychi soy deta yeil ka ?
    Tsech, jal sinchnache sadhan kontya khatedar ache aahe te nmud karta yayla hve.

    ReplyDelete
  5. ज्या खातेदाराचे नाव उताऱ्यातून विविध कारणाने कमी होते त्यांना कंस करून त्यावर आडवी रेष हा बदल व खातेदाराच्या
    नावासमोर खाता क्रमांक दर्शविणे हा बदल खूप छान झाला किंबहुना स्वागतार्ह झाला

    ReplyDelete
  6. भोगवटा वर्ग1 कधीपासून ते वर्ष.... भोगवटा वर्ग2झाल्यांचे वर्ष नोंद असावी...एकत्रीकरण योजनेत कोणते सर्व नंबर मिळून गट नंबर बनला नोंद क्षेत्र निहाय असावी

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send