अधिकार अभिलेखाशी आधार क्रमांक संलग्न करणे- संकल्पना टिपणी (Aadhar Seeding – Concept Note )
NAMASKAR FRIENDS
अधिकार अभिलेखाशी आधार क्रमांक संलग्न करणे- संकल्पना टिपणी
(Aadhar Seeding – Concept Note )
ग्रामीण भागातील शेतजमीन तसेच बिगरशेती जमीनीचे गा.न.नं. 7/12 व 8 अ हे महत्वाचे अधिकार अभिलेख असुन त्यामध्ये अशा मिळकतीच्या मालकी हक्काचे हस्तांतरण झाल्यास नोंदी घेतल्या जातात. सध्या ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी राज्यभरात सुरु असुन या आज्ञावलीतील मालकी हक्कासंबंधीची माहिती वापरुन नोंदणीकृत दस्तांची नोंदणी केली जात आहे. सध्या सर्वत्र शेतजमीन व अकृषीक क्षेत्रास मोठे मुल्य प्राप्त झाले आहे व मालकी हक्काचे हस्तांतरणामध्ये फसवणुक होण्याचे प्रमाण वाढले असुन त्यामुळे अनेक महसुली व दिवाणी दाव्यांचा जन्म होत आहे. यासाठी अशा शेती / बिगरशेती जमीनीचे हस्तांतरणातील गैरप्रकार रोखण्यासाठी जमीन मालकाचा आधार क्रमांक जमीन धारकाच्या खात्याशी संलग्न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबत केंद्र शासन देखील आग्रही असून याबाबत भारत सरकारने दिनांक 26/10/2017 रोजी राज्य शासनास तसे निर्देश दिले आहेत.
आधार क्रमांक अधिकार अभिलेखाशी संलग्न करण्याचे काम तीन टप्प्यात करणे अपेक्षीत आहे.
अ) आधार क्रमांक धारक हिच व्यक्ती जमीन धारण करणारा/ भोगवटादार असल्याची खात्री करणे.
ब) आधार क्रमांक धारकाची eKYC करणे.
क) फेरफार घेवुन आधार क्रमांक धारकाचा आधार क्रमांक खातेदाराच्या खात्याशी संलग्न करणे.
अ) आधार क्रमांक धारक हिच व्यक्ती जमीन धारण करणारा/ भोगवटादार असल्याची खात्री करणे.
अर्जदार व्यक्ती स्वत:साठी व कुटुंबातील इतर सह हिस्सेधारकांसाठी विहीत नमुन्यात अर्ज करुन अधिकार अधिकार अभिलेखाशी आधार क्रमांक संलग्न करण्याची मागणी करतील. याबाबत प्रथमत: संबंधित तलाठी आधार क्रमांक धारक व्यक्ती हीच जमीनधारक / भोगवटादार / खातेदार असल्याची खात्री करील यासाठी तलाठी स्थानिक चौकशी करुन व पंचाची मदत घेऊन व्यक्तीच्या खरेपणाबद्दल स्वत: खात्री करील. अर्जासोबत ज्या खातेदारांचे आधार क्रमांक संलग्न करायचे आहेत त्यांच्या आधारकार्डची छाया प्रत सादर करील. या आधार कार्डाच्या छायाप्रतीवरील 1) नांव 2) लिंग 3) जन्मतारीख 4) पत्ता 5) फोन क्रमांक इत्यादी माहिती योग्य व अचूक असल्याची खात्री म्हणुन आधार धारक स्वत: सही करेल तथापि या आधार कार्डावरील कोणतीही माहिती चुकीची असल्यास त्या माहितीला वर्तुळ करुन योग्य माहिती त्यावर लिहून आधार कार्डधारक व अशा दुरुस्त केलेल्या माहितीची अचुकता दर्शविणारा अन्य पुरावा म्हणुन अर्जासोबत कागदपत्राची स्वसाक्षांकित प्रत सादर करेल. अशा अर्जासोबत या आधार कार्डाच्या छायाप्रतीसह त्याचा फोटो असणारा ओळखीचा पुरावा म्हणुन 1) पॅन कार्ड 2) निवडणूक ओळखपत्र 3) नोंदणीकृत दस्ताची प्रत, 4) MNREGA चे जॉब कार्ड, 5) शासकीय ओळखपत्र अथवा 6) रेशन कार्ड यापैकी एक पुरावा स्वसांक्षाकीत करुन जोडण्यात येईल. ओळख पटविताना आधार कार्डधारक खातेदाराच्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या एकापेक्षा जास्त व्यक्ती त्याच गावात असु शकतात त्यामुळे अशावेळी आधारक्रमांक धारकाचीच संबंधित जमीन मिळकत असल्याची तसेच ही मिळकत अन्य धारकाची नसल्याची खात्री तलाठी यांना स्वत: करावी.
अर्जदाराची / आधार क्रमांक धारकाची ओळख पटविणे हाच मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्याने त्यावेळी मंडळ अधिकाऱ्याने सुध्दा ओळख योग्य रित्या पटल्याची स्वत: खात्री करावी. अर्जदार व ज्याचा आधार क्रमांक संलग्न करायचा आहे त्याची ओळख पटल्यानंतरच पुढे कार्यवाही सुरु करता येईल .
ब) आधार क्रमांक धारकाची eKYC करणे :-
पहिल्या टप्प्यात आधार क्रमांक धारकाची योग्य ओळख पटल्यानंतरच अशा खातेदाराचे eKYC UIDAI च्या सर्व्हरशी बोटांचे ठसे पडताळुन केली जाईल (Biometric authontication) ज्या आधार क्रमांक धारकाची ऑनलाईन पडताळणी (eKYC) होईल तोच खातेदार आपला क्रमांक त्याच्या खात्याशी संलग्न करण्यास पात्र होईल. खातेदाराचे नांवाने अथवा खाते नंबरने खाते शोधुन त्याची आधार क्रमांकाच्या माहितीशी रुजवात घेतली जाईल. खातेदाराचे पहिले नांव, मधले नांव व आडनांव यापैकी सर्व नावे जुळल्यास 100%, दोन नांवे जुळल्यास 66%, एकच नांव जुळल्यास 33% व एकही नांव न जुळल्यास 0% रुजवात समजणेत येईल. ज्यावेळी 33% किंवा त्यापेक्षा कमी रुजवात कमी आढळून आल्यास दोन पंच ( ज्यांची eKYC झालेली आहे असे ) यांची साक्ष घेऊन हाच आधार धारक जमीनीच्या भोगवटादार असल्याची खात्री करुनच आधार क्रमांक संलग्न करता येईल. एखाद्या गावात एक समान नावे असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास टोपण नावावरून खातेदाराची ओळख पटवावी लागेल तसेच अश्या बाबतीत सदरची जमीन मिळकत समान नाव असलेल्या अन्य व्यक्तीची नाही ह्याची खात्री तलाठी मंडळ अधिकारी यांनी करावी त्यानांतच आधार क्रमांक संलग्न करण्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल . अशा पध्दतीने रुजवात झालेल्या व eKYC झालेल्या सर्व खातेदारांचा UIDAI कडुन प्राप्त डेटा व अर्जावरुन भरलेल्या डेटा स्वतंत्ररित्या आज्ञावलीत साठवून ठेवला जाईल. दिवसभरात अशा पध्दतीने अपलोड केलेल्या डेटापैकी सर्व साधारण 10 ते 15 खातेदार निवडुन फेरफार तयार करता येईल. अशा निवडणूक फेरफार केलेल्या खातेदारांची माहिती ई फेरफार आज्ञावलीमध्ये यासाठी फेरफार तयार करण्यासाठी उपलब्ध होईल व ओळखीसाठी वापरलेले पुरावे स्कॅन करुन अपलोड केले जातील.
क) आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी फेरफार तयार करणे :-
दुसऱ्या टप्प्यात खातेदाराची फेरफार तयार करण्यासाठी साठविलेली माहिती विशिष्ट क्रमांकासह ( Serial ID) ई- फेरफार अज्ञावलीत फेरफार तयार करण्यासाठी प्राप्त होईल. यासाठी अधिकार अभिलेखाशी आधार क्रमांक संलग्न करणे असा स्वतंत्र पर्याय असेल तो वापरुन विशिष्ट क्रमांक ( Serial ID) निवडूण फेरफार तयार करता येईल. अशावेळी त्या गावातील चालू फेरफार क्रमांक वापरुन नविन फेरफार विहीत नमुन्यात स्वयंचलित रित्या ( Template मधुन ) तयार होईल. त्याचा नमुना सोबत जोडला आहे.
सदर फेरफार तयार करण्यासाठी खातेदार यांनी अथवा त्याचे कुटुंबातील सदस्याने अर्ज केला असल्याने यासाठी पुन्हा सर्व खातेदारांना नोटीस बजावणे आवश्यक असणार नाही मात्र अशी नमुना नंबर 9 ची नोटीस विहीत मुदतीसाठी गावच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणे आवश्यक राहील. त्याची मुदत संपताच असा फेरफार तात्काळ मंजूर करता येईल व त्याचा अंमल तात्काळ त्याच वेळी होईल व त्या खातेदारांच्या नावासमोर सांकेतांक क्रमांक शेवटचे चार अंक दाखविण्यात येतील व संबंधित 7/12 वर असा क्रमांक नोंदविला असल्याचे चिन्हांकीत होईल.
अर्जदाराने आधार संलग्न करण्यासाठी दिलेला अर्ज संमतीपत्र व जोडलेली कागदपत्र तालुका अभिलेख कक्षात 10 वर्षे जतन करुन ठेवण्यात येतील.
शासन स्तरावरून या संकल्प टिपणीला मान्यता मिळावी , तसेच
१) खातेदार यांनी स्वत: अर्ज करून आधार क्रमांक अधिकार अभिलेखाशी संलग्न करण्याची विनंती केली असल्याने हा फेरफार घेण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्याची गरज नाही
२) या फेरफारामुळे गाव नमुना नंबर ७ मध्ये कोणताही बदल होणार नसला तरी असा फेरफार घेण्यास शासन स्तरावर निर्णय घेऊन मान्यता देण्यास विनंती आहे .
फेरफार चा नमुना
फेरफार क्र. परिणाम होणारे स.नं./ग.नं.
फेरफाराचा प्रकार :- आधार क्रमांक संलग्न करणे
माहिती मिळाल्याचा दिनांक :-
फेरफार घेतल्याचा दिनांक :-
खालील खातेदारांनी अर्ज करुन आपला आधार क्रमांक अधिकार अभिलेखाशी संलग्न करण्याची विनंती केल्यावरुन व खाली नमूद केलेल्या व्यक्ती ह्याच खातेदार असल्याची खात्री तलाठी ------ व मंडळ अधिकारी -------- यांनी केली आहे तसेच खातेदाराची e KYC देखील UIDAI शी केली असल्याने खालील प्रमाणे आधार क्रमांक बाजुस दाखल केलेल्या स.नं./ग.नं. मधील खातेदाराशी संलग्न करण्यात आले आहेत.
अ.नं. खातेदाराचे नांव खाते क्रमांक गट/सर्व्हे क्र. आधार क्रमांक
1 अ.ब.क. 200 125/1 xxx934
2
3
४
५
हितसंबंधीत व्यक्तीनी स्वत: अर्ज करुन फेरफार घेतला असलेने नोटीस बजावण्यात आली नाही .
( )
तलाठी ---------------
तारीख ---------------
आधार सिडींग बाबतच्या अर्जाचा नमुना
प्रति,
तलाठी -------------
तालुका ------------
अर्जदार :- श्री/श्रीमती ---------------------------- रा.--------------.
विषय :- अधिकार अभिलेखाशी आधार क्रमांक संलग्न करणेबाबत.
महोदय,
मी खाली सही करणार अर्जदार श्री./श्रीमती ---------------------रा. -------------------- विनंती पुर्वक अर्ज करतो की,
मी -------------- या गावाचा खातेदार असुन माझे नांवे / माझे समवेत माझे कुटुंबातील सदस्यांच्या नांवे खालील प्रमाणे शेतजमीन / बिगरशेती जमीन धारण केली आहे. या जमीनीच्या अधिकार अभिलेखाशी माझे / माझे कुटुंबातील सदस्यांचे आधारक्रमांक संलग्न करणेबाबत मी आपणांस विनंती करीत आहे. याबाबतचे संमतीपत्र मी सोबत स्वाक्षरी करुन सादर करीत आहे.
अ.क्र. खातेदाराचे नांव खाते क्रमांक गट/सर्व्हे नं. क्षेत्र आधार कमांक ओळखीचा पुरावा
1.
2.
3.
4.
5.
6.
7.
8.
वरीलप्रमाणे सर्वाचे धारण जमीनींचा तपशील, आधार क्रमांक अचुक असल्याची खात्री मी देत आहे. शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील संमतीपत्र , आधार कार्डाची प्रत व ओळखीचा पुरावा एकुण पाने 1 ते ------------ जोडली आहे. कृपया अर्जाची पोहोच मिळण्यास विनंती आहे.
( सही/आंगठा )
दिनांक अर्जदाराचे नांव --------------------
व पत्ता ----------------------------
संमतीपत्र
मी, आधार क्रमांक ---------------------------चा धारक राज्यशासन अथवा जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना माझा आधार क्रमांक, नांव आणि बोटांचे ठसे/iris UIDAI कडुन प्राप्त करुन घेण्यास संमती देत आहे. राज्य शासन अथवा जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी मला माझी ओळख पटविण्यासाठी घेतलेली माहिती मी धारण / भोगवटा करीत असलेल्या जमीनीच्या अधिकार अभिलेखांमध्ये केवळ ओळख पटविण्यासाठी व भविष्यात जमीन हस्तांतरणात कोणतीही फसवणूक होवू नये म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकत हस्तांतरणाचे वेळी वापरली जाईल व प्राप्त केलेली माहिती CIDR ला देऊन ओळख पटविण्याच्या कामाव्यतिरीक्त कोठेही साठविली जाणार नाही किंवा इतर कोणाशीही देवघेव केली जाणार नाही अशी मला शासनाने माहिती दिली आहे. त्यास माझी संमती आहे.
( )
आधार क्रमांक धारकाचे नांव व स्वाक्षरी
Comments