मातोश्री कै.गं.भा.गजराबाई जगताप- आमची बाई – आमचे स्फूर्तीस्थान
आमची बाई – आमचे स्फूर्तीस्थान
– मातोश्री कै.गं.भा.गजराबाई जगताप
माझी आई, आम्ही तिला प्रेमाणे “बाई” म्हणायचो. तिचे दुःखद निधन माघी एकादशी शनिवार दि. ८.२.२०२५ रोजी सायंकाळी ५.४० वा. खराडी, पुणे मुक्कामी झाले त्या निमित्ताने तिच्या आठवणी दाटून आल्या.
आमच्या मातोश्री कै.गं.भा.गजराबाई हरिभाऊ जगताप (पाटील)
मुळची नळवणे ता. जुन्नर ची बापूसाहेब हांडे देशमुख यांची कन्या, कै. शंकराराव देशमुख व डॉ. राजाराम देशमुख यांची बहीण. आमचे आजोळ नळवणे
म्हणजे आमच्यासाठी एक प्रेमाचे ठिकाण, आमच्या लहानपणी आंबे व
करवंदांची मेजवानी म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची, कुलदैवत
खंडोबा देवस्थान व यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आजोळी जाणे व्हायचे. आमचे मोठे
मामा – शंकरमामा म्हणजे जुन्या काळचे पोस्टमन परंतु अत्यंत काटक व प्रेमळ मामा.
आमचे दुसरे मामा म्हणजे आमचे कुटुंबाचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय डॉ. राजाराम
देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले
कृषि विद्यापीठ, राहुरी जिल्हा अहिल्यानगर.
आम्ही सर्व आमच्या आईला “बाई” म्हणायचो, आमची बाई म्हणजे आमचे स्फूर्तीस्थान. आम्ही आगदी लहान असल्यापासून आमची
बाई शेती आणि शेतातली काम अत्यंत कष्टाने व प्रामाणिकपणे करायची, अगदी तुटपुंजा परंतु कुकडी नदीच्या काठावर असलेल्या बागायत क्षेत्रातून बागायती पिके घेऊन येणार्या
उत्पन्नातून माझ्यासह बंधु डॉक्टर शिवाजीसह दोन्ही बहिणीची शिक्षण पूर्ण करून
आम्हाला लौकिक अर्थाने सक्षम बनवण्याचे श्रेय आमच्या बाईचे. आमच्या बाईचा दिवस
पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. पहाटेच जात्यावर दळण दळून दिवस उजाडे पर्यन्त
स्वयंपाक पुर्ण करून सूर्योदयाला आमची बाई शेतात असायची. आमच्याही दिवसाची सुरुवात
बाईच्या पहाटेच्या जात्यावरील ओव्यांनी व वडीलांच्या रेडीओ वरील भक्तिसंगीताने
व्हायची. त्यामुळेच मी कधीच सूर्योदयापर्यन्त झोपल्याचे किंवा अंथुरणात लोळत
पडल्याचे आठवत नाही. आमचे आई वडील नेहमी सांगायचे “लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य
धनसंपदा लाभे”. आम्ही भावंडे देखील बाईला सकाळी शाळेत जाण्यापूर्वी शेतातील कामात
मदत करायचो व संध्याकाळी शाळेतून आल्यावर देखील जनावारांसाठी चारा काढण्यासारखी
काम करायचो त्यामुळेच आम्हाला शेती आणि शेतकर्या विषयी नेहमीच आदर व आपलेपणा
वाटतो असे मला वाटते.
आमच्या गावात त्याकाळी फक्त ७ वी
पर्यन्तच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती त्यामुळे आमचे दोन्ही बहीणींची
शिक्षण ७ वी च्या पुढे जाऊ शकली नाहीत परंतु तुम्ही शिकले पाहिजे व तुमच्या मामा
सारखे मोठे झाले पाहिजे असे आमची बाई म्हणायची म्हणूनच मी इयत्ता ८ वी व ९ वी
आळकुटीच्या रयत शिक्षण संस्थेच्या साईनाथ विद्यालयात पुर्ण केली परंतु सायकलवरुन
दररोज २५/३० किलो मीटर च्या प्रवास करून आल्यानंतर माझा अभ्यास काही होत नाही
म्हणून आई वडिलांनी मला न्हावर्याला मोठ्या बहीणीकडे शिक्षणाला ठेवले. मी माझी १०
वी माझ्या बहीणी व आमचे मेहुण्यांकडे कै. गोपीनाथ राजे निंबाळकर यांचेकडे राहून पुर्ण
केले. पुढे मी आमचे मेहुणे प्राचार्य
डॉक्टर गोविंद राजे निंबाळकर यांचे संपर्कात आल्याने श्रीगोंद्याला समाजकल्याण
विभागाच्या हॉस्टेलवर राहून ११ वी व १२ वी पुर्ण केली. तुला मामांसारखे मोठ व्हायचं
आहे असे बाईचे सांगणं असल्याने मी पुढे B.Sc.(Agri.) करायचा
निर्णय घेतला. त्याचवेळी बंधु शिवाजी सन १९८९ च्या दहवीच्या बोर्डाच्या परीक्षेत
आमच्याच गावातील जयमल्हार हायस्कूल मधून पहिला आला. आता त्याला आमच्या गावातील
पहिला डॉक्टर करायची हिम्मत आमच्या बाईने दाखवली. त्यामुळे त्याने देखील
श्रीगोंद्यात ११ वी व १२ वी शासकीय वसतिगृहात राहून पुर्ण केले व त्यानंतर वैद्यकीय
शिक्षणासाठी हातकणंगले कोल्हापूर ला बी.ए.एम.एस. साठी ॲडमिशन घेतले. माझे शिक्षण
शासकीय कृषि महाविद्यालय पुणे येथे सुरू असल्याने ते अत्यंत माफक फी मध्ये सुरू
होते परंतु बंधुला डॉक्टर करणे तसे जिकिरीचे होते दरमहिन्याला किमान १० हजार रुपये
पाठवायला लागायचे तरी आमचे दादा-बाई (आई- वडील) कधी डगमगले नाहीत किंवा खचले नाहीत.
अत्यंत काटकसरीत संसार करीत १२ वर्षे नेहार मळ्यात कुडा-मेडाचे घरात राहून त्यांनी
आम्हाला सक्षम बनवले. माझे कृषि महाविद्यालयातील हॉस्टेल वरील पुण्यातील वास्तव्य
सुरू असताना आमची बाई पहाटे चार वाजता उठून स्वयंपाक करून वडील जेवणाचा डबा सकाळी
६ वाजता पुणे येथे जाणार्या एस. टी. ने पोहचवायचे, तो मला
शिवाजीनगर (पुणे) येथे सकाळी साडेनऊ वाजता न चुकता मिळायचा. असे घरचे अन्न खाऊन मी
कृषि पदवीधर झालो पुढे मी M.Sc.(Agri) राहुरी विद्यापीठातून
मामांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आणि त्याच वेळी मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा
कडून तहसिलदार (वर्ग-१) पदासाठी निवडलो गेलो तो बाईच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा
क्षण होता तो शब्दात सांगता येत नाही.
मला नेहमी वाटते मी तहसिलदार म्हणून
निवडलो जाणे आणि बंधु शिवाजीला आमच्या गावातील पहिला डॉक्टर करण्याची किमया फक्त
आमच्या आई वडीलांची पुण्याई व प्रामाणिक कष्ट यामुळेच घडली असावी म्हणूनच मी असे
मानतो की आपण मात्र निमित्त आहोत करता करवितो तो परमेश्वर आहे.
आमच्यातील जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा,
साधेपणा जो काही असेल तो आमच्या आई वडीलांची देन आहे असे मी मानतो. आपण आपल्या कुवतीप्रमाणे
एकमेकांना मदत केली पाहिजे व प्रत्येकाचे भले नाही करता आले तर आपण कोणाचे वाईट करु
नये किंवा कोणाचे वाईट चिंतू नये. आमच्या घरातील समृद्धि, समाधान, समज व संस्कार आहेत ती आमच्या
नळवणे कुळाची ख्याति आहे. आमचे जवळे कडलगच्या लहान मावशीचे बरोबर एक महिन्यापूर्वी
एकादशीच्या दिवशीच दुखद निधन झाले. आमची बाई व तीन मावश्य आणि दोन मामा असा परिवार
त्यामध्ये थोरले मामा पोस्टमन – कै. शंकरमामा देशमुख, लहान
मामा महान शाश्रज्ञ व कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख, मोठी मावशी रुंभोडीची (ता.
आकोले) त्याची तीन मुलं डॉक्टर मोहन देशमुख (सेवा निवृत्त प्राध्यापक), शरद देशमुख (सेवा निवृत्त माध्यमिक शिक्षक व शेतकरी संघटनेचे तालुका
अध्यक्ष) आणि पुणे व सातारा चे माजी
जिल्हाधिकारी व पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त आणि सध्याचे रयत शिक्षण
संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख (IAS). आमची दोन नंबरची मावशी
वेताळेची (ता. खेड) या मावशीची चार मुलं, थोरले जेष्ठ विधिज्ञ व पुण्याचे माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. डी. डी.
शिंदे, ॲड. कै. सुरेश शिंदे, सेवानिवृत्त
उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. चंद्रकांत शिंदे व पिंपरी चिंचवड मनपा चे उप आयुक्त
श्री. अविनाश शिंदे आणि सर्वात धाकट्या तिसर्या मावशीची पाच मुलं, सेवानिवृत्त कृषि अधिकारी श्री. सुभाष उर्फ हिरलाल सुर्वे, राहुरी कृषि विद्यापीठाचे प्राध्यापक व कृषि शाश्रज्ञ डॉक्टर उल्हास
सुर्वे, डाळींबाचे प्रसिद्ध व्यापारी श्री. बाळासाहेब सुर्वे, प्रगतिशील शेतकरी श्री. भरतशेठ सुर्वे व माध्यमिक शिक्षक श्री. प्रकाश
सुर्वे असा मावस बंधुचा आमचा मोठा परिवार. परंतु या सर्वांचे मार्गदर्शक व आदर्श
आहेत आमचे मामा डॉक्टर राजाराम देशमुख नुसते कुलगुरू नव्हे तर आमचे कुळाचे देखील
गुरु.
राज्यातील
डिजिटल सातबारा निर्मिती मध्ये व ई-फेरफार, ई-पीक पाहणी, ई-चावडी, ई-महाभूमी, ई-हक्क
या प्रकल्पांचे निर्मिती व अम्मलबजावनीच्या निमित्ताने माझे झालेले कौतुक व टी.
व्ही. वरच्या लाईव्ह मुलाखती पाहून आमची बाई म्हणायची मामा सारखा तूही मोठा झाला
त्यावेळी तिच्या मनातला भाव व डोळ्यातले आनंदाश्रू पाहून धन्य वाटायचे. आता कोण
कौतुक करील आमचे ? कोण मायेने हात फिरविल चेहर्यावरुन? नुसत्याच आठवणीने कंठ दाटून येतो. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
!.
आमच्या बाईच्या स्मृतीत !
रामदास जगताप
उपजिल्हाधिकारी, पुणे
मोब. नं. ९४२३००९७७७
Comments