रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आणखी एक स्वप्न होत आहे साकार - ई पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्यासाठीचा शासन निर्णय जाहीर

 आता शेतकरी मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करु शकणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे यामुळे शक्य होणार आहे, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आपल्या पिकांची नोंद घरबसल्या करता येणार आहे. शेतजमीनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र, दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली

टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे ही शक्य होईल, असेही थोरात यांनी सांगितले.


ई पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. आज त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुका स्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.


आणखी एक स्वप्न होत आहे साकार - ई पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी करण्यासाठीचा शासन निर्णय आज दिनांक ३० जुलै २०२१ रोजी झाला  जाहीर , १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२१ होणार प्रशिक्षण , प्रबोधन, प्रचार व प्रसिद्धी आणि १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात ई- पीक पाहणी मोबाईल ॲप होणार उपलब्ध 

रामदास जगताप 
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-पीक पहाणी प्रकल्प 
दि ३०.७.२०२१ 

Comments

Archive

Contact Form

Send