डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२
नमस्कार मित्रानो ,
राज्यात सुरु असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध होणारा 7/12 अचूक असावा यासाठी करावयाची कार्यवाही बाबत या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक रा.भू.अ.आ.का-4/चावडी वाचन/2017, दि. 05/05/2017 सूचना निर्गमीत करण्यात आल्या होत्या व त्यानुसार चावडी वाचनाअंती आढळून आलेल्या चूका दुरुस्त करण्यासाठी रि-एडिट मॉडयुल देण्यात आले होते. आज रोजी राज्यात रि-एडिट मॉडयुलचा वापर करुन 7/12 दुरुस्तीचे काम ९० % पुर्ण झाले असून राज्यातील २५० तालुक्यातील ३९५५५ गावामध्ये रि-एडिटचे काम घोषणापत्र १, २ व ३ सह १०० % पुर्ण झाले आहे. अशा गावातील ७/१२ चे प्रख्यापनाचे काम पुर्ण करण्याच्या सूचना यापुर्वीच दिनांक १३/३/२०१८ रोजी च्या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे प्रख्यापन पुर्ण झालेल्या गावातील सातबारा दिनांक १ मे,२०१८ पासुन डिजीटल स्वाक्षरीसह जनतेला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ७/१२ वर डिजीटल स्वाक्षरी करण्यासाठीचे मॉडयुल DSP-RoR राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. DSP-RoR मॉडयुल मध्ये ७/१२ वर डिजीटल स्वाक्षरी करण्यापुर्वी सदर ७/१२ अचूक असल्याची खात्री पुन्हा एकदा करावी. तसेच यानंतरही डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ मध्ये एखादी त्रुट अनावधानाने अथवा नजरचुकीने काही राहून गेल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा.
१. हस्तलिखीत ७/१२ शी तंतोतंत न जुळणारा डिजीटल स्वाक्षरीचा ७/१२ संबंधित तलाठी/मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यास सदर हस्तलिखीत व डिजीटल स्वाक्षरीचा ७/१२ व फेरफाराच्या च्या प्रती जोडून त्याबाबत तहसिलदार यांचेकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ चे कलम १५५ (लेखन प्रमादाची चूक) अंतर्गत आदेश पारीत करुन सदर आदेशान्वये दुरुस्ती करण्यात यावी.
२. डिजीटल स्वाक्षरी करण्यात आलेल्या ७/१२ मधील त्रुटी अर्जदार यांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर अर्जदार यांना हस्तलिखीत व डिजीटल स्वाक्षरीयुक्त संगणकीकृत ७/१२ सह तहसिलदार यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. अशा अर्जास DBA यांनी अर्ज प्राप्त झाल्याची पोहोच द्यावी व त्यांनतर त्रुटीबाबत खात्री करुन तहसिलदार यांनी पंधरा दिवसाचे आत म.ज.म.अ.1966 चे कलम १५५ (लेखन प्रमादाची चूक) अंतर्गत आदेश पारीत करावेत व सदर आदेशान्वये दुरुस्ती करावी. सदर दुरुस्तीनंतर तयार झालेल्या ७/१२ वर संबंधित तलाठी यांनी डिजीटल स्वाक्षरी करावी.
डिजीटल स्वाक्षरीचा ७/१२ दिनांक १ मे २०१८ ते ३१ जुलै ,२०१८ या कालावधीत जनतेला विनामूल्य देण्यात येणार आहे व दिनांक १ ऑगष्ट २०१८ पासून सदर सेवा सशुल्क करण्यात येणार आहे. याबाबत योग्य तो प्रसार व प्रसिध्दी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालयांनी त्यांचे स्तरावर करावी.
Comments