रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी प्रकल्प एक नवा दृष्टीकोन - संक्षिप्त टिपणी - दिनांक २९ जुलै २०२१

 

पीक पाहणीची माहिती मोबाईल अॅपद्वारे गांव नमुना नं. १२ मध्ये शेतकऱ्यांनी नोंदविण्याचा प्रकल्प.

ई-पीक पाहणी विषयी संक्षिप्त टिपणी - दिनांक २९ जुलै २०२१

_________________________________________________________________________________

१) प्रस्तावना:- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार गांव नमुना नंबर ७ हा अधिकार अभिलेख असून, गाव नमुना नंबर १२ हा  पिकांची नोंदवही ठेवण्या संदर्भात आहे. सध्याच्या गांव नमुना नंबर १२ मधील पिकांच्या नोंदी संबंधित तलाठी घेतात. प्रचलित नियमाप्रमाणे संबंधित तलाठी यांनी पूर्व सूचना देऊन त्यांच्या  कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील सर्वेनिहाय पीक पाहणी करून गाव न. नं. १२ अद्यावत करणे अपेक्षित आहे. तथापि लोकसंख्या वाढीमुळे खातेदारांच्या संख्येत वाढ, गट विभाजनामुळे गटांच्या संख्येत वाढ, गाव विभाजनामुळे गावांच्या संख्येत वाढ, त्याचबरोबर मागील काही दशकापासून गैर महसुली कामात फार मोठ्या प्रमाणत झालेली वाढ, या सर्व बाबींमुळे नियमात अभिप्रेत असलेले पीक पाहणीचे काम पूर्ण करण्यासाठी तलाठ्यांना आटोकाट परिश्रम करावे लागतात. त्यामुळे पीक पाहणीच्या प्रक्रियेत शासना सोबत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तलाठ्यांच्या कामाचा बोजा कमी करून कामाची गुणवत्ता वाढविणे अगत्याचे आहे.

२) ई-पीक पाहणी प्रकल्पाचे उदिष्ट:- माहिती तंत्रज्ञानाचा  वापर करून (IT Platform) क्षेत्रीय स्तरावरून पिक पाहणीचा वस्तुस्थिती दर्शक व सद्यस्थिती दर्शक अहवाल (Real Time Crop Data)  पारदर्शक पद्धतीने संकलित करणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा आणि पिकाच्या नुकसानीचे  दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे इत्यादी उद्देशाने पिक पाहणी बाबतची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा (मोबाईल ॲप) गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने टाटा ट्रस्टस च्या मदतीने  शासनाने ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप (Farmer friendly App) विकसित केले आहे.

३) ई-पीक पाहणीचे वैशिष्टे:- ई-पीक पाहणी प्रकल्पात पीक पाहणीच्या प्रक्रियेत शासनासोबत शेतकऱ्यांचा सहभाग व भागीदारीचा समावेश करण्यात आला आहे. सदरील ॲपमध्ये पिकांचा नोंदणीबरोबरच जलस्त्रोताची साधने जसे की, विहीर, कालवा, नदी, बोरवेल इत्यादी तसेच सिंचनाचा प्रकार जसे की, ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा पारंपारिक या बाबींचा समावेश करता येतो. या ॲप मध्ये बांधावरची झाडे, फळझाडे तसेच पालेभाज्या नोंदविण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे, त्याच प्रकारे शेड नेट हाउस, पॉली हाउस यांची देखील नोंद करता येते. शेतातील उभ्या पिकाचा Geo-Tagged फोटो ज्यामध्ये अक्षांश-रेखांश, दिनांक आणि वेळ दर्शवली जाते. अश्याप्रकारे अचूक माहिती संकलित होण्यास मदत होते.

      शेतकऱ्यांनी नोंदविलेली पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी NIC, पुणे तर्फे तलाठी यांचे वापरासाठी ई पीक ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. जतन करण्यात आलेली माहिती शासनाच्या विविध विभागास शेतकऱ्यांशी संबंधित कल्याणकारी योजना राबविण्यासाठी जलद गतीने उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे संकलित महितीचा विविध महत्त्वपूर्ण उपयोगासाठी वापर करता येतो. 

४) ई-पीक पाहणी अँप्लिकेशन हाताळण्याची कार्यपद्धती:-

(१) शेतकरी नोंदणी प्रक्रिया - नोंदणी करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोर वर ई-पीक पाहणी असे टाईप करून डाउनलोड करून इंस्टॉल करावे त्यानंतर ते अँप ओपन करावे. नवीन नोंदणी बटनावर क्लीक करावे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गावाचे नाव निवडावे. सातबारावर असलेल्या नावानुसार पहिले नाव, मधले नाव, आडनाव, गट नं, किंवा खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडून नाव शोधावे. मोबाईल नंबर पडताळून पहा आणि पासकोड मिळवण्यासाठी पुढे जा हे बटन दाबावे. त्यानंतर आपल्याला चार अंकी पासकोड मिळेल व तो रकान्यात टाकावा.

(२) पिकाची माहिती नोंदविणे - पिकाची माहिती नोंदवा हे बटन दाबावे त्यानंतर आपली खात्याची माहिती दिसेल. त्यामध्ये आपले खाते गट निवडावे. शेतात असणाऱ्या उभ्या पिकांच्या नोंदणी साठी हंगाम निवडणे खरीप, रब्बी, उन्हाळी आणि संपूर्ण वर्ष हंगाम या पैकी योग्य पर्याय निवडावे. पिकाचे नेमके क्षेत्र हेक्टर आर मध्ये टाकावे, पिकाचा वर्ग, जल सिंचनाचे साधन निवडावे. त्यानंतर पिकांची लागवड दिनांक भरावा व मुख्य पिकाचे छायाचित्र शेताच्या जास्तीत जास्त आतमध्ये जाऊन फोटो काढावा आणि माहिती सबमिट / अपलोड कारवी.

(३) गाव नमुना नं १२ अद्यावत करणे प्रक्रिया - शेतकरी यांनी त्यांच्या शेतातील उभ्या पिकाची माहिती ई-पीक पाहणी अँप द्वारे अपलोड केल्या नंतर संबंधित तलाठी यांनी नोंदीस मान्यता देण्याची प्रक्रिया विकसित केलेल्या ई पीक आज्ञावलीच्या माध्यमातून गाव नमुना नं १२ मध्ये पिकांच्या नोंदी अद्यावत होतात व असा अद्यावत गाव नमुना नं १२ त्वरित डिजिटल स्वाक्षरीत केला जात असल्याने तो तात्काळ डाऊनलोड करण्यासाठी महाभूमी पोर्टलवर उपलब्ध होतो.

५) ई-पीक पाहणीचे फायदे:-

(अ) महसूल विभाग- तलाठी यांच्या कामाचा बोजा कमी करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देणे तसेच गावं नमुना –११ (जिन्नसवार पेरे पत्रक) तयार करण्यसाठी याची मदत होणार आहे.

(ब) कृषी/पणन/सहकार विभाग- विश्वसनीय पिकांच्या माहिती आधारे शासनस्तरावर कृषीविषयक कार्यक्षम धोरण आखण्यासाठी, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा आणि पिकाच्या नुकसानीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री सुलभ करणे, कृषी गणना प्रक्रिया सुलभ करणे, हवामान तसेच किडींचा प्रादुर्भाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना तातडीने संदेश देणे या सर्व बाबींसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे.

(क) शेतकऱ्यांसाठी फायदे- कृषी व इतर सर्व खात्याच्या शेतकरी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत ई-पीक पाहणी द्वारे अद्यावत केलेला ७/१२ ऑनलाईन उपलब्ध करणे, पीक कर्ज / पीक विमा / हमीभाव खरेदी केंद्र / प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना / नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान भरपाईसाठी सदर ॲपचा वापरामुळे अत्यंत सुलभ होणार आहे.

६) ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रगती व उपलब्धी:- शेतकरी, अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यामध्ये प्रकल्पा विषयीची जागरूकता निर्माण झाली, शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. शेतकऱ्यांना मोबाईल ई-पीक पाहणीची नवीन पद्धत स्वीकाहार्य आहे.  सर्व पथदर्शी तालुक्यात सर्वच महसुली गावात कमी अधिक प्रमाणात प्रकल्पाची अंमलबाजवणी झाली. पथदर्शी २० तालुक्यात फेब्रुवारी २०१९ ते ३१ मार्च २०२१ अखेर ईपीपी मध्ये नोंदणी केलेल्या खातेदारांची संख्या ५,९३,६०९, त्यापैकी ४,७५,९०८ खातेदारांनी पिकाची माहिती अपलोड केली. अपलोड केलेल्या पिकाचे क्षेत्र ५,७३,०८२ हेक्टर आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून सर्वाधिक विविध ३५३ पिकांची माहिती संकलित होऊ शकली. प्रकल्पाची उपुक्तता विचारात घेऊन या वर्षीच्या खरीप हंगामापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रकल्प अंमलबजावणीचा निर्णय नुकताच शासनाने घेतलेला आहे.

७) प्रकल्प अमंलबजावणी- क्षेत्रीय नियोजन आणि रणनीती:-

जिल्हाधिकारी यांचेसाठी मानक कार्यप्रणाली (SOP) खालीलप्रमाणे राहील.

1.   प्रचार व प्रसिद्धी (IEC) - जनजागृती करण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रांना प्रकल्प सुरु करण्याबाबतची माहिती पुरविणे, व्हिडिओ/ ऑडिओ क्लिप तयार करणे, गाव निहाय माहिती फलक तयार करून प्रसिद्ध करणे 

2.   सर्वसमावेशक आदेश - ज्या मध्ये खालील बाबी समाविष्ट करून जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करावेत

a.   जिल्हा/ उप विभाग (महसूल व कृषी) तालुका स्तरावरील महसूल व कृषी अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. 

b.   जिल्हा/ उप विभाग (महसूल व कृषी) तालुका स्तरावरील ई पीक पाहणी विशेष कक्ष स्थापन करून अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. 

c.   दैनंदिन प्रगती अहवाल तयार करण्यासाठी मदत कक्षात तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जबाबदाऱ्या निश्चित करणे. 

d.   जिल्हा/ उप विभाग (महसूल व कृषी) तालुका स्तरावरील समन्वय समित्या स्थापन करणे.

e.   गाव निहाय तलाठी / कृषी सहाय्यक यांना कामाचे वाटप करण्यासाठी तहसीलदार यांना सूचित करणे 

3.   समन्वय अधिकारी – दैनंदिन समन्वय राखण्यासाठी जिल्हा / उप विभागीय / तालुका स्तरावर कार्यक्षम समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे.

4.   मदत कक्षाची स्थापना - शेतकऱ्यांच्या अँप संबंधित दैनंदिन अडचणीचे निवारण करून मार्गदर्शन करणे या साठी मदत कक्षाची विभागीय / जिल्हा / उप विभागीय / तालुका स्तरावर स्थापना करणे

5.   दैनंदिन प्रगती अहवाल - दैनंदिन प्रगती अहवाल तयार करण्यासाठी मदत कक्षात तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती

6.   प्रशिक्षण - प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा/तालुका/गाव पातळीवर करणे व त्या नुसार कार्यशाळा आयोजित करणे

7.   गाव निहाय जबाबदारी - संबंधित तहसीलदार यांनी तालुकयातील तलाठी व कृषी सहाय्यक यांना लेखी आदेश निर्गमित करून गाव निहाय जबाबदारी दयावी.  

8.   व्हाट्सअँप ग्रुप तयार करणे - कामकाजाचे दैनंदिन आढावा घेण्यासाठी गाव पातळीवर सुरु असलेल्या विविध स्तरावर (तलाठी,कृषी सहाय्यक/महसुली गावे / तालुका/ जिल्हा स्तरावर) यांचे स्वतंत्र व्हाट्सअँप ग्रुप तयार करणे 

9.   विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात ई-पीक पाहणी कक्ष स्थापन करणे व त्यातून विभागाच्या कामावर नियंत्रण ठेवणे.

10. महसूल अधिकाऱ्याच्या बैठकीत त्या त्या हंगामात कामकाजाचा नियमित आढावा घेणे

11. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / विभागीय कृषी सह संचालक /जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर त्या त्या हंगामात नियमित आढावा घेणे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ई -पीक पाहणी प्रकल्पासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात मदत कक्ष स्थापन केला असून 

त्याचा फोन नं. ०२०२५७१२७१२ असा आहे

ई- पीक पाहणी प्रकल्पासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालय स्थरावर अंमलबजावणी कक्ष स्थापन केला आहे

ई- पीक पाहणी च्या प्रशिक्षण, प्रबोधन, प्रचार व प्रसिद्धी साठी ई-पीक पहाणी मोबाईल ॲप चे डेमो व्हर्जन उपलब्ध करून दिले असून ते डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा

डेमो अप्प = https://drive.google.com/file/d/17dYxewNW5cdCBAUBGdy-pbaUOXZX5V_P/view?usp=drive_web

 


श्री रामदास जगताप 

उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक , ई पीक पाहणी प्रकल्प 


ई पीक पाहणी प्रकल्पाचे मुख्य नियंत्रक

जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, (महाराष्ट्र राज्य), पुणे

Comments

Archive

Contact Form

Send