रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार साठी ऑनलाईन दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधक यांनी घ्यावयाची दक्षता.- एकत्रित सुधारित सूचना


विषय - ई फेरफार साठी ऑनलाईन दस्त नोंदणी  करताना दुय्यम निबंधक यांनी  घ्यावयाची दक्षता.

                      राज्यात गेल्या २/३ वर्षा पासून ई-फेरफार प्रणाली व आय-सरीता चे INTEGRATION करण्यात आले असून गाव नमुना ७ वर दस्त करून देणाऱ्याची नावे असल्याशिवाय दस्त नोंदणी करता येत नाही . सध्या फक्त १. खरेदी ,२. बक्षीसपत्र , ३. हक्कसोडपत्र व ४. गहाणखत हे चार दस्त प्रकार ONLINE पद्धतीने नोंदविले जातात व अन्य प्रकारच्या दस्त नोंदणी साठी स्किप पर्यायाचा वापर केला जातो . अश्या ONLINE दस्त नोंदणी साठी खालील प्रमाणे दक्षता घेणेत यावी . 

१.     खरेदी करून घेणाराचे नांव, भरताना पहिले नाव , मधले नांव ,  आडनांव  व असल्यास टोपण नाव असे स्वतंत्र रकान्यात भरावे. संपूर्ण नाव एकाच रकान्यात भरू नये.
२.     खरेदी देणाराचे नांवे त्याच गावात जमीन खाते असल्यास त्याचा खाते नं. नमूद करून त्याचे नाव देखील  7/12 वरुनच घ्यावे त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नये मात्र जमीन खरेदी घेणार त्या गावातील खातेदार नसल्यास TKN म्हणजेच Temporary Khata Number असे नमूद करून दस्त नोंदणी करावी.
३.     जमीनीचे मालकी हक्काचे  हस्तांतर बाबत होणारे सर्व दस्त शक्यतो ऑनलाईनच नोंदवावेत  काही तांत्रिक कारण असल्यास आपले वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून त्याचे कारण नमूद करूनच  स्किप पर्याय वापरावा  (Skip Option) वापरताना देखील ONLINE 7/12 वर खरेदी देणाराचे  नांव भोगवटादार सदरी असेल तरच  दस्तनोंदणी करावी.
४.     खरेदीदाराच्या नावाच्यापुर्वी श्री., श्रीमती, सौ, गं.भा., कै.,डॉ.,श्रीमंत, इंजि,पै.,अशी विशेषणे लिहु नयेत.
५.     जमीन खरेदी देणार व घेणार यांचा संगणकीकृत ७/१२ व खाते उतारा ( गाव नमुना नं.8 ) हा  दस्ताचा भाग करावा असे परिपत्रक मा. नोंदणी महानिरीक्षक यांनी यापूर्वीच काढले आहे त्याची अंमलबजावणी करावी. दस्त नोंदणी साठी राज्यात कोठेही  हस्तलिखित ७/१२ वापरू नये.
६.       खरेदी घेणार त्यागांवात खातेदार असताना TKN टाकु नयेखरेदी घेणार वैयक्तिक असेल तर त्याचे वैयक्तिक खाता क्र. खरेदी घेणाऱ्याचे खाते नं. म्हणुन घ्यावे (खरेदी वैयक्तिक व खाते नंबर समाईकातील असे असु नये.)
७.     ७/१२ वरील एकक हे.आर.चौ.मी. (शेतजमीन )असेल तर दस्तनोंदणी देखील हे.आर.चौ.मी.मध्येच करावी.
८.     ७/१२ वरील एकक आर.चौ.मी.(बिनशेती जमीन)मध्ये असेल तर दस्त नोंदणी देखील आर.चौ.मी.मध्येच करावी.
९.     दस्तनोंदणी करताना जमीन प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्याचा मेसेज आल्यास गरजेप्रमाणे परवानगी आदेशाची प्रत तहसिलदार यांना दाखवुन 7/12 दस्तनोंदणीसाठी तात्पुरता खुला (Unblock)  करुन घेणे बाबत पक्षकारांना मार्गदर्शन करावे.असा तात्पुरता खुला  केलेला ७/१२ फक्त एका दस्त नोंदणीसाठी खुला राहतो हे देखील लक्षात घ्यावे .या बाबत सविस्तर सूचना आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयाशी संलग्न असलेल्या दस्त लेखनिक यांना देण्यात याव्यात तसेच तशी स्पष्ट सूचना कार्यालयात दर्शनी भागावर लावावी.
१०.७/१२  वर नमूद .नं. व पोटहिस्सा नंबर प्रमाणेच स.नं. व पोटहिस्सा नंबर दस्तात नमुद करूनच दस्त नोंदणी होत हाये ना या बाबत खात्री करावी.
११.पावर ऑफ ॲटर्नीद्वारे दस्त नोंदणी करताना POA मध्ये ॲटर्नी धारकाचे नांव नमुद करावे. मात्र देणार घेणार चे नाव त्या त्या व्यक्तीचेच/ संस्था यांचे नमूद करावे.
१२.महिला खरेदीदारांची नावे लिहिताना पूर्वाश्रमीचे / लग्नापूर्वीचे नावे असे सूची २ मध्ये लिहू नयेत.
१३.सामाईक / संयुक्त खात्यातील दस्त करून देणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्व सह हिस्सेधारकांची नावे नमूद नसल्यास व उर्वरित सह हिस्सेदार दस्त नोंदणीला हजार नसल्यास अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र (अंशतः / पूर्णत:) अथवा अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र ( अंशतः / पूर्णत:)  या पैकी योग्य ते आर्टिकल वापरावे . मात्र एखाद्या सामाईक / संयुक्त खात्यातील काही सह हिस्सेधारक दस्त करून देत असतील व त्यास त्या खात्यातील उर्वरित सर्व सहहिस्सेधारक मान्यता देणार म्हणून उपस्थित असतील तर दस्त करून देणाऱ्यांची नावे निवडून त्यास SKN म्हणजेच Saler Khata Number नंबर नमूद करावा. ज्या व्यक्तींचा समूह प्रत्यक्ष दस्तात हक्क देणार म्हणून समाविष्ट नाहीत त्यांचे समूहाला SKN नंबर देवू नये.  
१४.दस्तामध्ये देणाराचे नांव नमूद करताना फक्त  जी व्यक्ती प्रत्यक्ष दस्त करून देणार आहे त्यांचीच नावे  निवडावीत .  समाईक खात्यातील अन्य सह हिस्सेदार अथवा इतर हक्कातील व्यक्तींनी  किंवा ७/१२ वर नसलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींनी संमती दिली असल्यास त्यांची नांवे संमती / मान्यता देणार म्हणुन घेण्यात यावीत दस्त करून देणार म्हणून घेऊ  नयेत .
१५.समाईक / संयुक्त खात्यात दस्त करुन देणाऱ्याचे क्षेत्र निश्चित केलेले नसल्यास व सर्व सह हिस्सेदार दस्त करून देत नसल्यास त्याला अविभाज्य हिश्श्याचे खरेदीपत्र ( पुर्ण ) ( अंशत ) असे दोन अनुच्छेद नविन तयार करुन दिले आहेत त्यापैकी एक पर्याय वापरावा.  अशा व्यवहारामध्ये क्षेत्र नमूद करू नये क्षेत्रा ऐवजी अविभाज्य हिस्सा असे नमूद करावे. ( फक्त मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठी क्षेत्र विचारात घ्यावे )  तथापि त्यासाठी तुमचे नावासमोर तलाठयाकडुन क्षेत्र टाकुन आणावे असे पक्षकारांना सांगु नये.         ( कोणत्याही कारणाने वैयक्तिक खाते प्रकारासाठी हे पर्याय वापरू नयेत )
१६.दस्त करुन घेणार कंपन्या, संस्था, संघटना, कारखाने असल्यास त्याची नांवे नमुद करताना प्रथम नांवमध्ये ( First Name)   मधले नांव ( Middle Name) मध्ये एक व इतर सर्व नांवे शेवटचे नाव (Last Name) या रकान्यात नमुद करावीत.
१७.खरेदीदार संस्था / महामंडळाचे जे नाव ७/१२ वर येणे अपेक्षित आहे तेच नाव खरेदी घेणार म्हणून नमूद करावे . प्राधिकृत व्यक्ती / प्रतिनिधी यांचे नाव खरेदी घेणार म्हणून घेऊ नये व असे  नावे POA म्हणूनच सामैष्ट करावे. कोणत्याही ठिकाणी शासनाचे वतीन / स्थानिक स्वराज्य संस्थांचे वतीने / राज्य किंवा केंद्र शासनाची महामंडळे यांचे वतीने जमीन खरेदी केली जात असल्यास त्यात POA म्हणून फक्त पदनामे नमूद करावीत त्यात त्या अधिकारी किंवा पदाधिकारी यांचे वैयक्तिक नाव नमूद करून दस्त नोंदणीची सूची २ भरू नये .
१८.ऑनलाईन दस्त नोंदणी करताना ७/१२ व खाते उतारे यांची माहिती उपलब्ध होत नसल्यास अथवा दस्त नोंदणी बाबत काही एरर / सूचना प्रणालीत दिसत असल्यास आपले तालुक्यातील नायब तहसीलदार ( ई फेरफार ) अथवा तहसीलदार तसेच सह जिल्हा निबंधक यांचेशी संपर्क करावा.
१९.दुय्यम निबंधक कार्यालय ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील सर्व महसूल गावे आय सरिता प्रणालीत उपलब्ध आहेत व त्याची नावे त्या गावच्या अधिकृत नावाप्रमाणे आहेत ह्याची देखील खात्री दुय्यम निबंधक यांनी करावी  तसेच वाडी विभाजन झालेने निर्माण झालेली सर्व गावे दस्त नोंदणीसाठी उपलब्ध आहेत व नियमित उपलब्ध होत आहेत ह्याची खात्री करावी.
२०. कोणत्याही ७/१२ ची भूधारणा वर्ग २ , सरकार अथवा सरकारी पट्टेदार असल्यास त्या ७/१२ तील क्षेत्राची दस्त नोंदणी कोणत्याही परिस्थितीत स्किप करून करू नये अन्यथा दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंधक / सह दुय्यम निबंधक शिस्तभंग कारवाईस पत्र राहील ह्याची नोंद घ्यावी.
२१.ऑनलाईन दस्त नोंदणी करताना देणार घेणार यांचे संपूर्ण व अचूक पोस्टाचे पत्ते ( पिनकोड नंबरसह), मोबाईल नंबर, (असल्यास) ई मेल आयडी देखील घ्यावेत यावेत व ते दस्त नोंदणी करताना वापरावेत तरच दस्त नोंदणी झाल्याचा व ऑनलाईन फेरफार घेण्याची प्रक्रिया तलाठी  स्थरावर सुरु झाल्याचा मेसेज संबंधित पक्षकारांचे मोबाईलवर येईल . हे व्यवसाय सुगमता (EODB) सध्य करण्यासाठी अत्यावश्यक आहे . कोणत्याही दुय्यम निबंधक यांनी पक्षकार यांचे वकील अथवा दस्त लेखनिक यांचे मोबाईल नंबर दस्त नोंदणी करताना प्रणालीत वापरू नये .
२२.सामाईक अथवा संयुक्त खात्यातील व्यक्तीच ( सहहिस्सेधारक ) फक्त हक्कसोडपत्र करू शकतात . कोणत्याही सामाईक अथवा संयुक्त खातेधारकाला त्या खातेधारकांचे शिवाय अन्य व्यक्तीला हक्काचे हस्तांतर करायचे असल्यास बक्षीसपात्र करणे आवश्यक आहे अशावेळी हक्कसोडपत्र करू नये.
२३.दस्त नोंदणी साठी महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या ( शासनाच्या ) अधिकृत संकेतस्थळावरून (सशुल्क) उपलब्ध होणारे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ अथवा तलाठी स्वाक्षरीने मिळणारे संगणकीकृत ७/१२ ग्राह्य धरावेत. अशा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर प्रत्येक पानावर खाली डाव्या कोपऱ्यात QR code छापेलेला असतो तसेच प्रत्येक पानावर “ हा ७/१२ अभिलेख (दि ------- रोजी --- वाजता ) डिजिटल स्वाक्षरीत केला असलेने त्यावर कोणत्याही  सही शिक्क्याची आवश्यकता  नाही” असे स्पष्ट सूचना दिलेली आहे . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या प्रत्येक पानावर १६ अंकी पडताळणी क्रमांक ( Verification ID)  दिलेला आहे तो क्रमांक वापरून आपल्याला अशा ७/१२ ची सत्यता hhtps://aapleabhilekh.mahabhumi.gov.i/dslr  या संकेतस्थळावरून Verify 7/12   हा पर्याय वापरून पडताळणी करता येईल. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी फक्त तलाठी स्वाक्षरीच्या ७/१२ चा आग्रह धरू नये मात्र भूलेख या संकेत स्थळावरून ( मोफत) उपलब्ध होणारे  ७/१२ व खाते उतारे ज्यावर VIEW ONLY असा वाटरमार्क आहे व “या संकेतस्थळावर दर्शविलेली कोणतीही माहिती कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी वापरता येणार नाही” अशी स्पष्ट  सूचना छापण्यात आलेले आहे. ते ७/१२ व खाते उतारे दस्त नोंदणी साठी ग्राह्य धरू नयेत व वापरू नयेत . QR code व पडताळणी क्रमांक नसलेले असे  ७/१२ काही ठिकाणी आपले सरकार सेवाकेंद्र अर्थात महा ई-सेवा केंद्रचालक व सेतू चालक सही शिक्के करून विकतात ते ७/१२ व खाते उतारे दस्त नोंदणीसाठी व कोणत्याही कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरू नयेत.
        याबाबतचे माहिती व तंत्रज्ञान विभागाहे शासन परिपत्रक क्रमांक: मातंसं-2019/प्र.क्र.21/से 5/39,   दि.१९/१२/२०१९  चे अवलोकन करून त्याप्रमाणे काळजी घ्यावी.
               वरील प्रमाणे सर्व सूचनांचे पालन सर्व दुय्यम निबंधक यांनी केले तरच ई फेरफार व आय सरिता प्रणाली जोडणी ( लिंकेज ) यशस्वी होईल व त्याचा खरा फायदा सामान्य जनतेला होईल असे वाटते.


आपला
रामदास जगताप

दि १२.१.२०२० 




Comments

Archive

Contact Form

Send